नागपूर : राज्यात अलीकडेच झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या या नियमित प्रक्रियेचा भाग असून, यामुळे कोणीही नाराज नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधूंच्या शिल्पकृतीचे’ मंगळवारी नागपुरातील संविधान चौक येथे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते़ ठराविक कालावधीने ‘आयएएस’ अधिकाऱ्यांकडे नवीन जबाबदारी सोपविली जात असते. त्यामुळे या बदल्यांमध्ये आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. जर कोणाला काही खटकले असेल तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत मंत्रिपदावरून काहीही मतभेद नसल्याचे सांगितले. भाजपा व शिवसेनेमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच मंत्रिपदांचे वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे व यंत्रणा पूर्णक्षमतेने या कामाला लागल्या आहेत. यासंबंधात कोणाला काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी शासनाजवळ त्या मांडाव्यात, असे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सूचक वक्तव्य केले.
‘आयएएस’ बदल्यांवरून कोणाचीही नाराजी नाही
By admin | Published: January 07, 2015 1:54 AM