मुंबई: औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच यावेळी त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नसल्याने न्यायाची अपेक्षा करणेच चुकीचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
औरंगाबादेत शुक्रवारी नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एनआरसी लागू करणार नाही असे केंद्र सरकार सांगत आहे. मग महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारण्यासाठी जागा का निश्चित करण्यात आली? दीड ते पाच लाख नागरिक ठेवण्यासाठी हे सेंटर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर मुस्लिम समाज या कायद्यामुळे जागृत झाला. मागासलेले 40 टक्के नागरिक अजूनही जागृत झाले नाहीत. हे हिंदू बांधवही एनआरसीचा शिकार होणार असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.
तर याच मुद्यावरून त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही. सरकारच्या तावडीत ही व्यवस्था सापडली आहे. त्यामुळे अशा न्यायव्यवस्थांकडे न्याय मागणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखेच असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.
अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. तर मुंबईतील आंदोलनात सुद्धा मुस्लिमांपेक्षा इतर समाजातील लोकांची अधिक उपस्थिती होती. त्यामुळे यातून स्पष्ट होते की, मुस्लीम समजाप्रमाणे हिंदू सुद्धा नागरिकत्व कायद्याचा विरोधात असल्याचे आंबेडकर म्हणाले.