मुंबई : मुंबईच्या रेडीरेकनरच्या दरात सरसकट वाढ केली जाणार नाही. रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्यास त्याचे मुंबईतील घर बांधणी, पुनर्विकास आणि मालमत्ता कर यावर काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज नागपुरात दिले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. तसेच त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी भेटदेखील घेतली. तेव्हा त्यांनीही सरसकट वाढ न करण्याचे आश्वासन दिले. खडसे यांनी विधानसभेत सांगितले की, मुंबईतील रेडीरेकनरचे दर यापूर्वीच्या सरकारच्या काळात दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढविण्यात येत होते. त्यामुळे त्याच्या परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांवर होतो. मुंबईत मालमत्ता कर हा रेडीरेकनरच्या दरावर अवलंबून असल्यामुळे रेडीरेकनरचे दर वाढल्यास मालमत्ता कराचा बोजा मुंबईकरांवर वाढतो, तसेच मुंबईत अनेक झोपडपट्टी व जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या योजनांना चालना देण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. अशावेळी जर रेडीरेकनरचे दर वाढले तर त्याचा परिणाम अशा पुनर्विकासाच्या योजनांवर होऊन या योजना रखडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेता सरसकट वाढ केली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये आमदार मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, योगेश सागर, भाई गिरकर, सरदार तारासिंग, मनीषा चौधरी, राम कदम, अतुल भातखळकर, अमित साटम, कॅप्टन सेल्वन, भारती लव्हेकर आदींचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)
रेडीरेकनरच्या दरात सरसकट वाढ नाही
By admin | Published: December 23, 2015 1:30 AM