मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे नाव प्रदेश भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या निमंत्रणातून गायब झाल्याची जबाबदारी कोणाची, यावर भाजपाच्या प्रदेश कार्यालयात खल सुरु आहे़ पण, कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागाने दोन दिवसांपूर्वी क्लीन चिट दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रदेश कार्यालयाने तत्काळ प्रसिद्धिपत्रक काढले होते. दुसरीकडे भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या निमंत्रणपत्रामध्ये इतर प्रमुख नेत्यांची नावे टाकण्यात आली आणि मुंडेंचेच कसे राहिले, यासाठी जबाबदार कोण, यावर कोणीही बोलायला तयार नाही. भाजपाच्या नेत्यांनी यावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. राज्यातील महायुतीचे शिल्पकार म्हणून मुंडे यांच्याकडे बघितले जात असताना त्यांच्याच पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला त्यांचा विसर पडला. या गंभीर प्रकाराची चौकशी करून तसे करणार्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मुंडे समर्थकांची मागणी आहे. मात्र, भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आज ‘जणू काही घडलेच नाही’ अशा पवित्र्यात पदाधिकारी वावरताना दिसले. (विशेष प्रतिनिधी)
मुंडेंच्या अपमानाची साधी चौकशीही नाही
By admin | Published: May 16, 2014 2:58 AM