मुंबई : आरटीओमध्ये वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी २५0 मीटरचे ट्रॅक उपलब्ध करून देण्यात यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले. त्यानुसार, परिवहन आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या आरटीओंची जागा शोधण्यासाठी धडपड सुरू आहेत. यात महत्त्वाच्या असलेल्या मुंबईतील तिन्ही आरटीओंना फिटनेस चाचणीसाठी ट्रॅक मिळत नसून, अजूनही जागेचा शोध सुरू आहे. त्यासाठी परिवहन आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडेही अर्ज करण्यात आले आहेत. वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी २५0 मीटरचे ट्रॅक उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत. या आदेशानुसार, राज्यातील आरटीओंकडून फिटनेस चाचणी ट्रॅकसाठी जागेचा शोध सुरू आहे. राज्यातील आरटीओच्या ५0 कार्यालयांपैकी २५ कार्यालयांचे फिटनेस चाचणी ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. यात काम न झालेल्यांपैकी मुंबईतील वडाळा, ताडदेव आणि अंधेरी आरटीओचा समावेश आहे. या महत्त्वाच्या असलेल्या तिन्ही आरटीओंकडून परिवहन आयुक्त कार्यालय, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा उपलब्ध करून देण्याचे अर्ज सादर केले आहेत. अंधेरी आरटीओने फिटनेस चाचणी ट्रॅकसाठी वर्सोवा फिशिंग इन्स्टिट्यूटच्या बाजूलाच असलेल्या जागेची मागणी केली आहे. ही जागा मिळाली नाही, तर अंधेरी आरटीओसमोर दुसऱ्या जागेचा पर्याय नाही. वडाळा आरटीओने मुलुंड टोलनाका येथील एक किलोमीटर आत असलेली जागा, तसेच वडाळा ट्रक टर्मिनल येथील जागा अशा दोन जागांचे अर्ज परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठविले आहेत. यातील एक जागा मिळेल, अशी आशा वडाळा आरटीओला आहे. ताडदेव आरटीओकडूनही जागेचा शोध घेण्यात येत आहे. ताडदेव आरटीओने वरळी डेअरीजवळील जागा मागितली असून, तसा प्रस्ताव परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे. (प्रतिनिधी)
फिटनेस चाचणी ट्रॅकसाठी जागाच नाही
By admin | Published: October 10, 2016 6:12 AM