नवी मुंबई: जम्मू काश्मीरामधून कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये डेरेदाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना अपमानाचे घोट पचवावे लागले. व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने त्यांनी मुलगा संजीवसोबत कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला. मात्र एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपमान झाल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केले. विशेष म्हणजे गणेश नाईक यांच्यासारखीच अवस्था माजी खासदार किरीट सोमय्या यांचीही झाली. व्यासपीठावर जागा न मिळाल्याने ते चक्क पायऱ्यांवर बसून होते. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. परंतु व्यासपीठावर त्यांच्यासाठी जागाच नसल्याचे त्यांना कार्यकर्त्यांकडून कळले. त्यामुळे त्यांनी तेथून लगेचच काढता पाय घेतला. गणेश नाईक यांचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्त असलेल्या कार्यक्रमाचे निमित्त पुढे करून नाईकांनी तेथून प्रस्थान केले. वास्तविक, नाईकांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाची घाई असती, तर ते कार्यक्रमस्थळी आलेच नसते, अशी कुजबुज यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली. दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हेदेखील कार्यक्रमासाठी रंगायतनमध्ये आले होते. परंतु त्यांनाही व्यासपीठावर जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर पायऱ्यांवर बसण्याची वेळ आली. कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठावरील नेत्यांनी त्यांना २/३ वेळा व्यासपीठावर बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. २ दिवसापूर्वीच गणेश नाईक समर्थक नागरसेवकांसह भाजपमध्ये दाखल झाले. आयारामांची भाजपमध्ये काय गत होते, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.
व्यासपीठावर जागाच नाही; भाजपाच्या कार्यक्रमातून नाईक पितापुत्रांचा काढता पाय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 8:59 PM