पुणे : परदेशात जाणाऱ्या पुणेकरांच्या सोयीसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत शिवनेरी व्होल्वोची सेवा सुरू करण्याचे एसटीने ठरवले आहे. मात्र विमानतळ प्रशासनाने थांब्यासाठी जागा न दिल्याने या प्रस्तावाला ‘रेड सिग्नल’ मिळाला आहे. विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांची पुणे ते बोरिवली शिवनेरी व्होल्वोने थेट विमाननतळापर्यंत ने आण करता यावी, म्हणून एसटी प्रशासनाने एअरपोर्ट आॅथॉरिटीकडे विमानतळाच्या परिसरात बस थांबवण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, एअरपोर्ट आॅथॉरिटीने हा प्रस्ताव अडकवून ठेवल्याने एसटी प्रशासनाला ही सेवा देणे शक्य झालेले नाही.विमानतळावर जाण्यासाठी एसटीची थेट सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. शिवनेरी व्होल्वोच्या तुलनेत खासगी गाड्यांचे दर जास्त आहेत. एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीन व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत, त्यात एअरपोर्ट ते पुणे या मार्गावर नवीन व्होल्वो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या खासगी आॅपरेटर पुणे ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पिकअप आणि ड्रॉपसाठी प्रत्येकी ८५० ते ९०० रुपये आकारतात. एसटीच्या शिवनेरी व्होल्वोचे भाडे त्याच्या तुलनेत फारच कमी राहाणार आहे. पुणे ते बोरिवली शिवनेरी व्होल्वोच्या दररोज २० फेऱ्या होतात. (प्रतिनिधी)
मुंबई विमानतळाजवळ प्रवाशी थांबाच नाही
By admin | Published: September 13, 2014 2:32 AM