ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सर्वाना उत्सुकता लागलेल्या मुंबई महापालिकेचे निकाल हाती आले असून शिवसेना 84 जागांसह नंबर एकचा पक्ष ठरला आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला घासून टक्कर दिली असून शिवसेनेपेक्षा फक्त दोनच जागा भाजपाला कमी मिळाल्या आहेत. बहुमत न मिळाल्याने आता शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार की दुसरे पर्याय निवडणार याकडे सर्वांचं लक्ष असून नेमकी काय भूमिका दोन्ही पक्ष घेणार आहेत हे येणा-या दिवसांमध्ये कळेल. मात्र 'मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही', असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नितीन गडकरींच्या या भूमिकेमुळे विधानसभेप्रमाणे महापालिकेतही दोन भाऊ मांडीला मांडी लावून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'शिवसेनेसोबत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विचाराने निर्णय घेतील. मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही', असं मत नितीन गडकरींनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिवसेनेची लढाई जवळपास बरोबरीत सुटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विकास आणि पारदर्शकतेच्या अजेंड्याला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला तर शिवसेनेने आपल्या परंपरागत मतदारांच्या आधारे यश मिळविले.
सकाळी शिवसेनेने निकालात आघाडी घेतल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला मात्र, दुपारनंतर भाजपाच्या एकेक जागा वाढत गेल्या आणि कमळ फुलू लागले. अंतिम निकालात दोघांमध्ये केवळ दोनचे अंतर राहिले. मिळाल्याने सत्तेचे समीकरण कसे असेल, भाजपा आणि शिवसेना एकत्र येतील या बाबत उत्सुकता आहे. अपक्षांना जवळ करण्याची रणनीती दोघांनीही आखली आहे.
गेल्यावेळी केवळ नागपूर महापालिकेत भाजपाकडे सत्ता होती. यावेळी सहा महापालिकांमध्ये एकहाती सत्ता, इतर दोन ठिकाणी सत्तेकडे वाटचाल आणि मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवित भाजपाने जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला जबर धक्के बसले. एकाही महापालिकेत त्यांना बहुमत मिळाले नाही वा सत्तेच्या जवळदेखील जाता आलेले नाही. मुंबईत केवळ ३१ जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
ठाण्याचा गड शिवसेनेने राखला असला तरी नागपूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अमरावती, अकोला या सहा महापालिकांमध्ये भाजपाने बहुमत मिळविले. सोलापूर आणि उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष असून इतर पक्ष/अपक्षांच्या सहकार्याने सत्तेत येईल, अशी स्थिती आहे.