जलवाहिनीचे काम सुरू : लातूरला पाण्यासाठी आणखी चार दिवसांची प्रतीक्षा
मिरज : जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर लातूरला पाणी पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी रेल्वे जलशुध्दीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत जलवाहिनीच्या कामाचा प्रारंभ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आला. लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. कृष्णा नदीतून उचललेले पाणीच थेट रेल्वेत भरले जाणार आहे. एक रेल्वे ५० टँकरची असून प्रत्येक टँकर पन्नास हजार लिटरचा आहे. त्यासाठी रेल्वे पाणीपुरवठा केंद्रापासून यार्डापर्यंत १ कोटी ८४ लाख खर्चून अडीच किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत करण्यात येणाऱ्या या कामासाठी टंचाई निधीतून मंजुरी रखडली असल्याने वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन शनिवारी काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाकडून जलवाहिनीच्या आराखड्यास तांत्रिक मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी रेल्वेस्थानकात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जलशुध्दीकरण केंद्रास भेट देऊन जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली. रेल्वे टँकर मिरजेपर्यंत पोहोचले तरी जलवाहिनीच्या कामास सुरुवात नसल्याने जिल्हाधिकारी गायकवाड, निवासी
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली....
जलवाहिनी खोदाईस शनिवारी सुरुवात झाली. रेल्वेकडून तांत्रिक मान्यता मिळविण्यासाठी आराखडा सादर करण्यात आला. रेल्वे यार्डात सिग्नल यंत्रणेचे जाळे असल्याने तेथे खोदकाम करण्यास अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने एक हजार मिटर लांबीची लोखंडी जलवाहिनी जमिनीवरून नेण्यात येणार आहे. जलशुध्दीकरण केंद्रापासून जलवाहिनीसाठी पीव्हीसी पाईप मिळत नसल्याने पाईप उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रेल्वेच्या यंत्रणेमार्फत आलेले टँकर रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत सहा तास भरण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी ५० टँकर पाणी भरून रेल्वे लातूरला पाठविण्याचे नियोजन सुरू होते. मात्र सायंकाळी अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या यंत्रणेमार्फत २५ लाख लिटर पाणी भरण्याची क्षमता नसल्याने टँकर भरण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे आता चार दिवसात जलवाहिनीचे काम पूर्ण करून टँकर पाठविण्यात येणार आहेत.
विभागीय व्यवस्थापकांकडून पाहणी....
रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक दादा भोय यांनीही मिरजेतील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. यार्डापर्यंत जलवाहिनीच्या तांत्रिक मान्यतेसाठी आराखडा पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. व्यवस्थापक सकाळी कोल्हापूरला रवाना झाल्याने त्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. मिरज स्थानकात अधिकाऱ्यांसोबत निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी बैठक घेतली. याप्रसंगी स्थानक अधीक्षक व्ही. रमेश, मकरंद देशपांडे, गजेंद्र कुल्लोळी, संदीप शिंदे, रोहित चिवटे, मनोहर कुरणे, ज्ञानेश्वर पोतदार उपस्थित होते.