डोंबिवली : आजकाल गावांतून, शहरांतून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. मोठमोठी हॉटेल्स, इमारती उभ्या राहत आहेत. सर्वत्र विकास होत असला तरी मनात मात्र अशांती आहे. मन:शांतीसाठी प्रयत्न केले जातात. पण, आध्यात्मिक विचारांतूनच शांतता मिळते, असे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले.माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात तीन दिवसांचा जीवनदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होेता. त्याच्या समारोप प्रसंगी प्रतिभा पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर देवीसिंग शेखावत, माजी आयुक्त रामनाथ सोनवणे, आयोजक शिल्पा सिंगारे उपस्थित होते. आपण सार्वजनिक कार्यक्रमांना फारसे जात नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, जीवनात अनेक प्रसंग येतात. संकटांचा सामना करावा लागतो. मनाची शांती मिळविण्यासाठी अध्यात्म हाच आधार आहे. यासाठीच अशा कार्यक्रमांची गरज आहे. माणसाने तामसी वृत्तीचा त्याग केला पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे. आपल्या देशात संतांनी खूप त्याग केला, कष्ट केले म्हणूनच आपण चांगले जीवन जगू शकतो. जगात सर्वच देशांत साधू-संत आहेत. मात्र, आपल्या देशात सर्वात जास्त संत होऊन गेले, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. दरम्यान स्वामी गोविंददेव गिरी यांचे तीन दिवस ‘जीवनदर्शन’ या विषयावर मागदर्शन झाले.
आध्यात्मिक विचारांतूनच मन:शांती मिळते
By admin | Published: April 27, 2015 3:50 AM