ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - भाजपा आणि शिवसेनेमधील युतीसंदर्भातील तणाव अद्यापही कायम आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या तिस-या बैठकीतही युतीबाबत तोडगा निघू न शकल्याने युती तुटण्याची चिन्ह दिसू लागल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दोन्ही पक्षांनी आपापले प्रस्ताव एकमेकांसमोर ठेवलेले आहेत, मात्र दोघांनाही ते प्रस्ताव मान्य नाहीत. भाजपाचा 114 तर शिवसेनेचा 60 जागांचा प्रस्ताव होता. मागील वेळेला 63 जागांवर लढलेल्या भाजपाला त्याही पेक्षा कमी म्हणजे 60 जागांचा प्रस्ताव पाहताच भाजपा नेत्यांनी तो अमान्य केला.
भाजपाची ताकद वाढलेली असताना कमी जागेचा प्रस्ताव का? अशी विचारणा झाली असता ‘आमची पण ताकद वाढली आहे. त्यामुळे आम्हालाही जागा वाढवून द्या.’ अशी शिवसेनेने उलट मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, युतीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावरुन युतीची तिसरी बैठकही निष्फळ ठरल्याचे दिसले.