लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जो कोणी पंतप्रधान असेल, त्याच्याच मर्जीप्रमाणे फक्त राज्यकारभार चालवला जाणार असेल तर आपल्या देशात खरंच लोकशाही आहे काय? लोकांच्या मताला आणि म्हणण्याला काही किंमत आहे की नाही? असे सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीकडे उंगुलीनिर्देश केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली. ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे सगळ्याचे केंद्रीकरण करायचंय की विकेंद्रीकरण? शेवटी ज्याच्या हाती काठी तो गुरं हाकी, हीच जर का राज्यपद्धती असेल तर राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी पंचायत राजच्या माध्यमातून खालपर्यंत ही स्वायत्तता दिली होती. आज मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी ही स्वायत्तता काढून घेऊन सर्व काही केंद्राच्या हाती ठेवण्याचा सपाटा चालू ठेवला आहे. जो कोणी पंतप्रधान असेल, त्याच्याच मर्जीप्रमाणे फक्त राज्यकारभार चालवला जाणार असेल तर आपल्या देशात खरंच लोकशाही आहे काय, असा सवालही त्यांनी केला.जीएसटी लागू करण्याबाबत ते म्हणाले, सगळा गोंधळ आहे. हा गोंधळ नुसता उगी राहून पाहण्यासारखा नाही. आता लोकांनीच निर्णय करावा की हे सहन करावं की लढावं. पाहा, गुजरातमध्ये छोटे व्यापारी जीएसटीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना मार खावा लागला. नोटाबंदीनंतर साधारणत: १५ लाख लोकांचा रोजगार गेल्या चार महिन्यांत गेला. नोकऱ्या गमवाव्या लागल्या. म्हणजे ६० लाख कुटुंबियांना त्याचा फटका बसला. नोटाबंदीमुळे जर का त्या पंधरा लाख लोकांना नोकऱ्या गमावल्या असतील त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था काय, असा सवालही ठाकरे यांनी केला.
देशात खरंच लोकशाही आहे? - ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:42 AM