मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेते सातत्याने विविध मुद्द्यांवरून टीका करताना दिसत आहेत. यातच आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा संतप्त सवाल केला आहे.
“फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?.” असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असल्याचंही त्यांनी म्हटलं.