मुंबई - नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिंदे गटात प्रवेश केलेल्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. कुणीतरी येडेगबाळे पकडायचे आणि प्रवेश करून घ्यायचा अशा शब्दात संजय राऊतांनी या पक्षप्रवेशाची खिल्ली उडवली तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काही बदल आवश्यक असतील तर ते झाले पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली.
विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कमीत कमी लोक पक्ष सोडून जातील यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरीही आम्ही कुठे कमी पडत असू तर याबाबत जरूर काही बदल झाले पाहिजेत असं मला वाटतं असं त्यांनी सांगितले आहे.
ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटात मागील महिन्यात नाशिकच्या १२ माजी नगरसेवक, जिल्हा संपर्क प्रमुख यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतरही ठाकरे गटातील गळती थांबत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असल्यानं त्याचा फटका ठाकरे गटाला बसत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राऊत आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र त्यात ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेतील असं सांगण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी शिवसेनेसाठी तळागाळात काम करणारे पदाधिकारीच शिंदे गटात प्रवेश करत असल्याने निश्चित ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला अपयश येत असल्याने त्याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होतील असं चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे.
'त्या' पदाधिकाऱ्यांची नावेही माहिती नाहीतजे येडेगबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून पक्षप्रवेश करून घेतात. नाशिकमधील शिवसेना जशीच्या तशी आहे. २-४ दलाल ठेकेदार तिकडे गेले असतील. जमिनीवरचा शिवसैनिक आणि शिवसेना जागेवरच आहेत. जे कुणी गेलेत त्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. मला माहिती नाहीत अशा शब्दात संजय राऊतांनी ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली.