...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:40 AM2023-01-14T10:40:53+5:302023-01-14T10:41:30+5:30
नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? असा प्रश्न राऊतांनी केला.
मुंबई - महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं, किमान समान कार्यक्रमावर ते सरकार चालवलं. ३ भिन्न विचारांच्या पक्ष एकत्र आले आणि सरकार बनवलं. या तिन्ही पक्षात समन्वय होता. ज्याप्रकारे सरकार चालवलं तो एकोपा विरोधी पक्षात काम करतानासुद्धा असायला हवा तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो ही भूमिका शिवसेनेची आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला तो नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षासोबत जी घटना घडली त्याकडे महाविकास आघाडीच्या दृष्टीने लक्ष द्यायला हवं होते. या ५ जागांच्या निवडणुकीबाबत एकत्रित बसून भूमिका ठरवणे, चर्चा करणे व्हायला हवं होते. ते दिसलं नाही. मी कुणालाही दोष देत नाही. नागपूर, अमरावतीच्या जागेबाबत काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीत काँग्रेसकडे उमेदवार नव्हता त्यांनी आमचा माणूस घेतला मग आम्ही का नाही लढलो? आमचे बुलढाणा जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती. तुम्ही त्यांना पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली मग ती आम्हीच लढलो असतो आणि अधिक जोमाने लढलो असतो असं राऊतांनी म्हटलं.
तसेच नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? तांबे यांच्या डोक्यात काय चाललंय आणि भाजपानं गुप्तपणे कारवाया केल्यात ते प्रत्येकवेळी आपल्याला समजतं असं नाही. त्यामुळे काँग्रेसला दोष देणार नाही. आम्हीही आमच्या पक्षात या प्रसंगाला सामोरे गेलोय. पण भविष्यात महाविकास आघाडी आणि आघाडीतील प्रमुख नेत्यांनी समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत असंही संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांसोबत युतीची शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. पण ती लपून राहिली नाही. त्याबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना माहिती देतो. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना कळवतो. त्यातून जो काही निकाल लागायचा तो कळेल. पण त्यातून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणे गरजेचे आहे असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.