मुंबई : मुंबईमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाल्यास भारतीय जनता पार्टी त्याचे स्वागतच करेल. राज्य सरकार अशा सामन्यासाठी संपूर्ण पोलीस संरक्षणदेखील देईल, असे सांगत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या भूमिकेला विरोध दर्शविला.शिवसेनेने आज बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून भारत-पाक क्रिकेट सामान्यासंदर्भात होणारी बैठक उधळून लावली. यावर भाजपाची भूमिका विचारली असता दानवे म्हणाले, शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेशी भाजपा सहमत नाही. पाकिस्तानची क्रिकेट टीम, गुलाम अली यांच्या मैफलीला केलेला विरोध आम्हाला मान्य नाही. आपले खेळाडू जगभर सामने खेळत असतात. पाकिस्तानसह कोणत्याही देशाचे खेळाडू आपल्याकडे पूर्वपरवानगीने आणि आमंत्रणावर खेळायला येत असतील तर त्यांना विरोध करता कामा नये. असे खेळाडू आले तर त्यांना आणि ते खेळत असलेल्या सामन्यांना संरक्षण देणे हे कोणत्याही सरकारचे कर्तव्य आहे. आजच्या प्रकारापूर्वी बीसीसीआयने पोलीस विभागाला पूर्वकल्पना दिली असती तर पोलीस बंदोबस्त नक्कीच पुरविला असता, असेही दानवे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत भारत-पाक क्रिकेट सामना झाला पाहिजे
By admin | Published: October 20, 2015 2:35 AM