विधानसभा निवडणूक पार पडली. महायुती पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत आली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांवरून आता विरोधकांकडून महायुतीला लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीला आश्वासनाची आठवण करून देत कोंडीत पकडलं आहे.
जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "वीज बिलात ३०% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे."
महाराष्ट्रात वीजदर सर्वात जास्त
"राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ - ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट ५.९० रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट ५.१६ ते १७.७९ रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत", असा मुद्दा जयंत पाटील यांनी मांडला.
पुढे जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, "वीज बिलात ३०% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी", असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.
महायुतीकडून अनेक आश्वासने
विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनेक आश्वासने दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करण्यासह पिकांना चांगला दर देण्यासंदर्भातही आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जातील.