गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप मानेंनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली आहे. आज माने यांनी माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
मुख्य म्हणजे गेल्या चार वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडी आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकत्र आहेत. परंतु या तिघांमध्ये उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने बिनसले आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील इंडिया आघाडीच्या कार्यक्रमाला गेलेले असताना इकडे महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षातील नेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही देण्यात आली होती. या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्यांना विधान परिषदेवरही पाठविण्यासाठी उमेदवारी देण्यात आली होती. आज अखेर माने यांनी शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.