'त्या' बैठकीला NCP चे ३ आणि आमचे ३ असे...; पहाटेच्या शपथविधीपूर्वी काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:12 PM2023-02-15T14:12:19+5:302023-02-15T14:13:08+5:30
२०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुंबई - भाजपा आणि शरद पवारांची चर्चा झाली होती याचा मीही साक्षीदार आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची परवानगी होती. २०१४ ला विश्वासदर्शक ठराव भाजपानं मांडला त्यावेळी अदृश्य हात कुणाचे होते हे सगळ्यांना माहिती. काही बैठकांमध्ये मीदेखील होतो. ती कागदे आजही द्यायला तयार आहे. त्यांच्याकडून ३ आणि आमच्याकडून ३ प्रतिनिधी होते. भाजपा-राष्ट्रवादी सत्तेत येण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले ते तथ्यहीन नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कधीही कदापि चुकीची माहिती ठेवणार नाहीत. हे सांगितल्याने भाजपाच्या जागा वाढणार आहेत का? शरद पवार आणि आम्ही सरकार बनवणार होतो ते सांगितल्याने भाजपाच्या जागा वाढणार नाहीत. २०१९ च्या निकालाच्या अगोदर २०१६-१७ मध्ये राष्ट्रवादीचे ३ आणि भाजपाचे ३ प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. त्या नेत्यांची नावे सांगणार नाही. आम्ही चर्चेला बसलो होतो. पवारांच्या परवानगीने पहाटेचा शपथविधी झाला हे फडणवीसांनी म्हटलं त्यावर नक्कीच विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच २०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात. अजित पवार एवढे मोठे पाऊल कसं उचलू शकतात हे राष्ट्रवादीचे नेते बोलतात. सर्व प्रतिष्ठा पणाला लावून ते येतील असं कुणाला वाटत नाही. स्थिर सरकारच्या दिशेने आपल्याला जायचंय हे सातत्याने अजित पवार म्हणत होते. भिजत घोंगडे ठेऊन राज्यात स्थिर सरकार देऊ शकणार नाही असं पवार सातत्याने बोलत होते असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात २ गट असतील असे वाटत नाही. कारण अजितदादांचे जेव्हा भाषण ऐकतो त्यांच्या भाषणात पवारांचा उल्लेख आदराने नेहमीच केला जातो. शब्दातून सन्मान लक्षात येतो. अजित पवार-शरद पवार यांच्यात मतभेद असतील असं दुरान्वये वाटत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. काँग्रेस-शिवसेना एकत्र येतील असा विचारही कुणी केला नाही. काँग्रेससोबत जाण्यास बाळासाहेबांचा तीव्र विरोध होता. राजकारणात भाजपा-काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही हे खरे. अजित पवारांसोबत शपथविधी झाला होता त्यामुळे ते येऊ शकतात की नाही हे सर्वांना ठाऊक आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.