ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - संरक्षण मंत्री म्हणून काम करताना माझ्यावर काश्मीर सारख्या मुद्यांचा दबाव होता. त्यामुळे मला गोव्याला परतायचे होते या विधानावरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घुमजाव केले आहे. आपण असे कुठलेच विधान केले नसल्याचे पर्रिकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी पीटीआय वृत्तसंस्थेने पर्रिकरांवर काश्मीर मुद्याचा दबाव असल्यामुळे त्यांना गोव्यात परतायचे होते असे वृत्त दिले होते.
पर्रिकर नोव्हेंबर 2014 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात गेले. मागच्या महिन्यात पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संरक्षण मंत्रीपदावर काम करत असताना दबाव होता असे कुठलेही विधान मनोहर पर्रिकर यांनी केलेले नाही असे भाजपाच्या प्रेस सेलकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना काश्मीर सारख्या मुद्यांचा दबाव असल्यामुळे मला गोव्यात परतायचे होते असे विधान मनोहर पर्रिकर यांनी केल्याचे वृत्त पीटीआयने दिले होते. आंबेडकर जयंतीच्या या कार्यक्रमाला एकही पीटीआयचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता असेही भाजपाच्या प्रेस सेलने म्हटले आहे.