ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ - कांद्याच्या बाबतीत परिस्थिती धक्कादायक आहे. इतकी वाईट परिस्थिती कधी नव्हती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. मांजरी येथे ते बोलत होते.
१५ दिवसांपूर्वी नितिन गडकरींकडे दिल्लीत यासंदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी राज्याचे मंत्री सुभाष देशमुख , सदाभाऊ खोत उपस्थित होते. त्यात नाफेडमार्फत कांदा खरेदीचा निर्णय झाला होता. पण राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याबाबत सरकार किती गंभीर आहे ते कळतं, असेही पवार म्हणाले.
हा विलंब शेतक-यांचे संसार उध्वस्त करणारा आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हा प्रस्ताव पाठवावा किंवा दुसरा काहीतरी पर्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. ५ पैसे किलो भाव मिळालेला कांदा कसा होता मला माहित नाही, पण कांद्याला किंमत मिळत नाही ही परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.