मुंबई-
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता आमदार उघडपणे आपलं मत मांडू लागले आहेत. शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी तर आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर संध्याकाळी 'वर्षा' निवासस्थान सोडलं आणि 'मातोश्री' गाठलं. 'वर्षा' सोडत असताना शिवसैनिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. याचाच उल्लेख करत काल पहिल्यांदा सामान्य शिवसैनिकाला वर्षावर प्रवेश मिळाला याचा आनंद असल्याचं म्हणत संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. राज्यातील राजकीय घडामोडीचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
"काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे", असा खळबळजनक आरोप संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
"शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो", असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आहे.
तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे?, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटता येत नव्हतं त्यावेळी मतदार संघाची आमच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी एकनाथ शिंदे नेहमी तत्पर असायचे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. शिरसाट यांनी पत्रातून व्यक्त केलेली खदखद आणि आरोपांवर आता शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.