ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ : काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते. आपल्यावर आरोप होत असताना आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. कुणी पुरावेही दिलेनाही.त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात व्यक्त केली.जिल्हा बँक सभागृहात रविवारी दुपारी १२ वाजता हा मेळावा झाला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना-भाजपा यांच्यात सुरु असलेला वाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच एकत्र आल्याने सभागृहात व त्यानंतर जिल्ह्यात चर्चेचा विषय होता. विशेष म्हणजे या तीनही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली नाही. खडेस व महाजन जवळ बसले होते व एकमेकांशी अधूनमधून संवाद साधत होते. या दोन्ही नेत्यांच्या हालचालींवर उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या. तुमच्या सारखाच मी सुद्धा घरी बसलो आहेखडसे म्हणाले, जो काम करतो तोच चुकतो. शासकीय नोकरी करीत असताना आरोप झाले तर तुम्हाला उत्तर तरी देता येते. मात्र पुरावे न देता आमच्यावर आरोप झाले. आरोपाचे उत्तरही आम्हाला देता येत नाही. त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्यावरील आरोपांना कुणी पुरावा दिला तर किमान समाधान तरी मिळेल. कुणी जमीन घेतली म्हणतो. कुणी जावायाने लिमोझिन कार घेतल्याचा आरोप करतो. जे काही आरोप असतील त्याचे पुरावे देण्याचे आव्हान आपण दिले आहे. मात्र ते देखील कुणी स्वीकारत नाही. त्यामुळेच तुमच्यासारखाच नाथाभाऊ घरी बसला असल्याचे सांगितल्यानंतर सभागृहात हास्याचे फवारे उडाले.दोन भाऊ सक्षम.. तिसऱ्या भाऊने बोलणे योग्य नाहीआमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रामसेवक आणि तलाठी हे पिशवीत संपूर्ण गाव घेऊन फिरत असल्याचे सांगितले. ग्रामसेवकांचे प्रश्न मांडण्यासाठी आज व्यासपीठावर नाथाभाऊ, गिरीशभाऊ उपस्थित आहेत. दोन भाऊ सक्षम आहेत. ते शासनस्तरावर निर्णय घेतील. त्यामुळे या ठिकाणी तिसऱ्या भाऊने (गुलाबभाऊ) जास्त बोलणे उचित नाही. ग्रामसेवकांच्या अडचणी मांडण्याचे काम मी करेल. सोडविण्याचे काम दोन्ही भाऊ करतील असे सांगितल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुरावा दिलेला नसताना शिक्षा झाली - खडसे
By admin | Published: July 03, 2016 5:01 PM