नागपूर : विरोधी पक्षातर्फे राज्यातील तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. या तिन्ही मंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत सफाई देत आपल्यावरील घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले.ई-टेंडरिंगद्वारे पारदर्शक निविदा प्रक्रिया - बावनकुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध कृषी सौरपंप खरेदी योजनेत शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात बुधवारी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सफाई देत संगितले की सौरऊर्जा पंप खरेदीसाठी ई-टेंडरींगद्वारे पारदर्शक निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. यात कमीत कमी बोली लावणाऱ्या निविदकास निविदा दिली आहे. अजून एकही सौरपंप लागलेला नाही, करारही झाला नाही, तर घोटाळा होण्याचा प्रश्न आलाच कुठून. मी या खात्याचा मंत्री असेपर्यंत एक पैशाचाही भ्रष्टाचार होणार नाही. आमच्या सरकारने एकही विद्युत शुल्क माफ केले नाही. सर्व आरोप खोटे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.शिक्षण संस्थांचालकांच्या दबावामुळे आरोप - तावडे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर अर्ली रिडर बुक व महापुरुषांच्या फोटो खरेदीत ९४ कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपाचे खंडन करीत तावडे यांनी सांगितले की, आघाडी शासनात ७८ कोटी रुपयांची अर्ली रिडर बुक खरेदी करण्यात आले होते. आपण ते १९ कोटी रुपयात खरेदी केले. तसेच महापुरुषांचे प्रत्येक फोटोमागे ४८०० रुपये खर्च होत होते. ते आपण १३०० रुपयावर आणले. त्यामुळे यात घोटाळ्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावरील आरोप हे केवळ मी शिक्षण संस्थांची कमाई बंद केली असल्याने संस्था चालकांच्या प्रेमापोटी व दबावापोटी केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाच हजार द्या आणि गणपतीची मूर्ती घेऊन जा - सावरा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनीआदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोटाळा करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून ८ लाख रुपये किमतीचा सोन्याचा गणपती भेट म्हणून स्वीकारला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचे उत्तर देतांना सावरा यांनी सांगितले की, विरोधकांनी ती मूर्ती माझ्याकडून ५ हजार रुपयात घेऊन जावी. मी संवेदनशील व्यक्ती आहे. या आरोपामुळे मी खूप व्यथित झालो. परंतु जशास तसे उत्तर देण्याचे मी ठरविले. आपण कुणालाही पाठीशी घालत नाही. घोटाळा करणाऱ्यांविद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे, मी सार्वजनिक जीवन सोडून देईल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
घोटाळे झालेच नाही
By admin | Published: December 23, 2015 11:34 PM