नवी दिल्ली – सध्याची परिस्थितीत राजकीय नेते पॉवरफुल झालेले आहेत आणि आम्ही पोलीस प्रशासक, बदल्या आणि पोस्टींगसाठी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहिलो आहोत. ही समाजासाठी चांगली बाब नाही असं सांगत माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पुणे हिंसाचारावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर म्हणाल्या की, ज्यावेळी नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा होता. त्यावेळी आमच्याकडे फार टेक्निकल पुरावा होता. पुणे बंदमध्ये हिंसाचार कसा करावा याबाबत एकदम मस्त पुरावा होता. माझे अधिकारीच मला तेव्हा म्हटले, मॅडम गुन्हा दाखल करू नका, आम्हाला तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पाहायचे आहे. त्यामुळे त्यावेळी मी खूप दबावाखाली होते. आपण जर असं केले तर आपल्याला पोलीस आयुक्त पद देण्यात येणार नाही. पोलीस अधीक्षक पद मिळणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.
त्याचसोबत अजित पवारांना मीडिया व्हिलन करतेय, पण मी जे घडलंय ते पुस्तकात लिहिलंय. व्हिलन तेव्हा होतो जेव्हा शासकीय जमीन आपण देऊन टाकली असती. पुणे पोलिसांना हा प्रस्ताव मान्य नाही असं आपण जेव्हा शासनाच्या निदर्शनास आणले. आम्ही ३ एकर जागा देणार नाही. त्यामुळे शासनाने आदेश मागे घेतले. माझ्या विरोधाची मला किंमत चुकवावी लागली. पण वाईट वाटले नाही. कारण हा योग्य निर्णय होता. मला निवृत्त होऊन ६ वर्ष झालीत, कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. मी पुस्तक वर्षभरापूर्वीच लिहिलंय, प्रकाशन उशीरा झाल्या. त्यामुळे टायमिंगबाबत आरोप चुकीचा आहे असंही मीरा बोरवणकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कुठल्याही राजकीय पक्षाला एकदम रोखठोक अधिकारी आवडत नाही. आपण कुठल्याही एका पक्षाला जबाबदार धरू शकत नाही. जे अधिकारी त्यांचे सांगणे ऐकतील असेच राजकीय नेत्यांना आवडतात असंही बोरवणकरांनी सांगितले.
दंगल घडवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंचे - भाजपा
उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दंगल घडवण्यामध्ये सर्वात अग्रक्रमाला आहेत. ते निलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकरांविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे होते. मिलिंद नार्वेकर आजही उद्धव ठाकरेंचे खासगी स्वीय सहाय्यक आहेत. मिलिंद नार्वेकर आणि निलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंचे आदेश होते, तुम्ही दंगली घडवा. आता या बाबतीतील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.