मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी प्रवेशाच्या आॅनलाइन जागांत ४ हजार ५००हून अधिक जागांची भर पडली आहे. अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इन हाउस कोट्यातील जागा आॅनलाइनमध्ये समाविष्ट केल्याने ही वाढ झाल्याचे मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने सांगितले.कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ जूनपासून सुरू झालेल्या आॅनलाइन प्रवेशासाठी अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इन हाउस कोट्याअंतर्गत एकूण १ लाख १९ हजार ५३८ जागा होत्या. त्यात अल्पसंख्याक कोट्यात ७० हजार ६३८, व्यवस्थापन कोट्यात १३ हजार ४७८ आणि इन हाउस कोट्यासाठी ३५ हजार ४२२ जागा उपलब्ध होत्या. मात्र कोटा पद्धतीने या जागा भरल्या गेल्या नाही, तर त्या आॅनलाइनसाठी देता येतात. त्यानुसार आत्तापर्यंत कोट्यातील ४ हजार ५००हून अधिक जागा समाविष्ट झाल्या आहेत. वाढीव जागांमुळे आॅनलाइन प्रवेशासाठीच्या जागांत मोठी भर पडली आहे. त्याचा फायदा आॅनलाइनसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकूण १ लाख ४९ हजार ८०८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. परिणामी, आॅनलाइन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ हजार जागा वाढल्यास एकूण १ लाख ५५ हजारांहून अधिक जागा उपलब्ध होतील, असे कार्यालयाने सांगितले. (प्रतिनिधी)
अकरावीच्या ४,५०० जागा वाढल्या
By admin | Published: June 24, 2016 4:48 AM