मुंबई : मालेगाव शहरात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलून मुंबईत आणण्याचे आदेश तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना दिले होते. मात्र, हा आदेश तोंडी आणि बेकायदेशीर असल्याने मुजावर यांनी सिंह यांचा आदेश पाळला नाही. परिणामी, मुजावर यांना एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आले, असा सनसनाटी दावा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीच्या वकिलांनी विशेष एनएआयए न्यायालयात गुरुवारी केला.
विशेष एनआयए न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू आहे. यावेळी आरोपी क्रमांक १० सुधाकर द्विवेदीतर्फे ॲड. रणजित सांगळे यांनी न्यायालयात गुरुवारी युक्तिवाद केला.
न्यायालयातील युक्तिवादपरमबीर सिंह यांनी मेहबूब मुजावर यांना मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते. हा आदेश तोंडी असून आणि लिखित नसल्याने सिंह यांचा आदेश मुजावर यांनी पाळला नाही. त्यांच्या आदेशाचे पालन न केल्याने मुजावर यांना सोलापूरमध्ये शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खोट्या प्रकरणात गोवण्यात आले.
ही माहिती मुजावर यांनी त्यांच्यावर चालविलेल्या खटल्यात सीआरपीसी कलम ३१३ अंतर्गत दिलेल्या जबाबात न्यायालयाला दिली. तसेच संदीप डांगे आणि रामचंद्र कलासंग्रा या दोघांचाही एटीएस कोठडीत मृत्यू झाला असून, एटीएसने त्यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात फरारी आरोपी दाखविले आहे, असा दावा मुजावर यांनी केला होता.
डांगे व कलासंग्रा यांना एटीएस कोठडीत मृत्यू झाला तरी त्यांना एटीएसने जिवंत असल्याचे दाखवून फरारी आरोपी म्हटले. आता ते एटीएसला हवे आहेत, अशी माहिती सांगळे यांनी न्यायालयाला दिली. शुक्रवारी सांगळे यांनी युक्तिवाद पूर्ण केला.