ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - पोलीसांनी मुंबईमधली १५ ठिकाणे सेल्फी काढण्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यामध्ये मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. बांद्र्यांच्या बँडस्टँडला सेल्फीचा नाद दोघांच्या जीवावर बेतल्यानंतर या निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस आले आहेत.
BBC ने दिलेल्या वृत्तानुसार बांद्रा बँडस्टँड, सायनचा किल्ला, वरळीचा किल्ला, मरीन ड्राइव्ह व गिरगाव चौपाटीसह १५ ठिकाणे सेल्फी काढण्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याची माहिती मुंबई पोलीसांचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी हिंदू सणासुदीच्या काळात सेल्फीवर बंदीचा पर्याय अमलात आणण्यात आला होता. आता पोलीस मुंबई महापालिकेच्या अधिका-यांशी संपर्क साधणार असून या सगळ्या ठिकाणी धोक्याच्या सूचना लावण्याचे तसेच जीवरक्षक तैनात करण्याचे सुचवण्यात येणार आहे.