आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राज्यातील विविध विकासकामांचं उद्घाटन झालं आहे. यामध्ये शिवडी-न्हावा शेवादरम्यानच्या अटल सेतूचं उद्घाटन, उरण-खारकोपर रेल्वे मार्गाचं उद्घाटन आदींचा समावेश आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.
शिवडी-न्हावाशेवा सेतूला अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. हा सेतू नावाप्रमाणेच अटल आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू हा भूकंपाचे मोठमोठे धक्के सहन करण्यास सक्षम आहे. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला. अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहावं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं असतं. आता आण सर्वांनी पंतप्रधानांना अभिवादन करूया, असं उपस्थितांना आवाहन करत एकनाख शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं.