मुंबई - शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाल्यापासून शिवसेनेचे नेते बंडखोर गट आणि भाजपा आमनेसामने आलेले आहेत. त्यातच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे बंडखोर शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका करत आहेत. १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणार असून, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याच आश्चर्य वाटून घेऊ नका, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी संजय राऊतांवर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ घालवण्यासारखं आहे. त्यांच्याबाबत आमच्या छोट्या प्रवक्त्यांना विचारा असा टोला लगावला.
संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याबाबत फडणवीस म्हणाले की,मला असं वाटतं की, असं जे नेते बोलताहेत ते किती भाबडे आहेत हे आपल्याला माहिती आहे. तसेच ते दिवसातून किती वेळा काय काय बोलतात हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे आपल्या तोंडाची वाफ घालवण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कृपया मला विचारू नका. त्याच्याकरता आमचे छोटे प्रवक्ते असतीस त्यांना तुम्ही विचारा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कुठलेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. १६ बंडखोर आमदार अपात्र ठरतील. किंवा त्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणवतील. अशा परिस्थितीत बंडखोरांपैकी किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला तयार आहेत. त्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा मराहाष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं, तर आश्चर्य वाटायला नको, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.