एकीकडे सांगलीची जागा काँग्रेसच्या नेत्यांनी बंड केल्याने धोक्यात आलेली असताना दुसरीकडे नाशिकमध्येही ठाकरे गटात बंडाचे वारे सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी शब्द देऊनही ऐनवेळी तिकीट दुसऱ्यालाच दिल्याने ठाकरे गटाचे नाशिकचे नेते विजय करंजकर यांनी बंडाची तयारी सुरु केली आहे. असे झाले तर इथेही ठाकरे गटाची जागा धोक्यात येणार आहे.
गेल्या एक दीड वर्षापासून मतदार संघात फिरत होतो. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिल्यामुळे मी मतदारसंघात फिरत होतो. माझे मतदारसंघात चांगले संबंध आहेत. कोणाच्या सांगण्यावरून माझी उमेदवारी कापली केली गेली, आणि दुसऱ्याला उमेदवारी दिली गेली, मला अजूनही कळत नाहीय, अशा शब्दांत करंजकर यांनी आपली भुमिका मांडली आहे.
मी लोकसभेचा फॉर्म आणला आहे. उद्या, परवा फॉर्म भरणार आहे. सगळ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी माझे घनिष्ट संबंध आहेत. गिरीश महाजन मला नवीन नाहीत, माझी भेट झाली आहे. त्यांनी देखील हे असे कासे झाले, असे मला विचारले होते. मी सर्व गोष्टींचा उहापोह करतोय, येणाऱ्या काळात मी माझी भूमिका घेईन, असे सूतोवाच करंजकर यांनी केले आहे.
मी मातोश्री भेट टाळल्याचा आरोप केला जात आहे. इथे बसलेले दलाल खोटे बोलत असतील. माझा थेट मातोश्रीशी संपर्क आहे. मी थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलतो. मी सांगायचो तेच मातोश्री करायची. मी कट्टरपणे काम केले म्हणून संघटना वाढल्याचा दावा करंजकर यांनी केला.