Vanchit Bahujan Aghadi ( Marathi News ) : महाविकास आघाडीसोबत जातावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले आहेत. अशातच आता आणखी तीन जागांवर वंचितकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. वंचितने आज जमील अहमद यांना कल्याणमधून उमेदवारी दिली असून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून संतोष गणपत आंबुळगे तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अफझल दाऊदानी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे पुन्हा मैदानात असून त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी दिली आहे. आता वंचितनेही या जागेवर आपल्या उमेदवाराची घोषणा केल्याने कल्याणमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
वर्षा गायकवाडांवर टीका
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या ज्या उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवत आहेत त्या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा करत असताना वंचितने गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ म्हणजे धारावी मतदारसंघातून लढतात आणि जिंकूनही येतात. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे दक्षिण―मध्य मुंबईमधून खासदार म्हणून जिंकून आलेले आहेत. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडून उत्तर―मध्य मुंबईमध्ये का उभ्या राहत आहे? हा प्रश्न आहे. साधे गणित असे की, जिथे वंचित बहुजन आघाडीची पकड अधिक आहे, तिथे आपण उभे राहणे आणि जिंकण्याची अधिक संधी घेणे हे कुठल्याही शेंबड्या पोराला समजू शकते. तर हे वर्षाताई यांना का समजू नये? ज्या मतदारसंघातून त्या उभ्या राहिल्या आहेत, त्या मतदारसंघात गेल्या ५ वर्षात त्या फिरकल्या सुद्धा नाही. शिवाय उत्तर―मध्य जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मतदार हे मुस्लिम समाजाचे असताना इथे मुस्लिम उमेदवार न देता बौद्ध उमेदवार देवून एक प्रकारे भाजपला जिंकून येण्यासाठी मोकळे रान सोडले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वर्षाताईंना विचारायचे आहे की, आपण असा स्वतःचा बळी द्यायला का तयार झाल्या? की भाजपाची ही नवीन खेळी आहे? आपले शिक्षक भरतीमधील घोटाळा बाहेर काढण्याबाबतचे संकेत तर नाही ना? काँग्रेसच्या नेत्यांना तुम्हाला जिंकून आणायचे आहे की, पाडायचे आहे?" अशी प्रश्नांची सरबत्ती वंचितच्या एक्स हँडलवरून करण्यात आली आहे.