ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - निवडणुकीच्या निकालानंतर आता शिवसेना सत्तेचे समिकरण जुळवण्याच्या तयारीला लागली आहे. तशी सुरुवातही शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता हातातून जाऊ नये यासाठी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या बंडखोरांनाच शिवसेना जवळ करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका स्नेहल मोर शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत. वहिनी स्नेहर मोरे यांना तिकीट न मिळाल्याने घाटकोपरमध्ये माजी शिवसेना विभागप्रमुख सुधीर मोरे बंडखोरी केली होती. यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
या सगळ्या घटनाक्रमात त्यांच्या वहिनी अपक्ष स्नेहल मोरे या एक हजार मतांनी निवडूनदेखील आल्या. दरम्यान, आज दुपारी सुधीर मोरेंसह स्नेहल मोरेही शिवसेनेत घरवापसी करणार आहेत.
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपा दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. शिवसेनेचा 84 तर भाजपाचा 82 जागांवर विजय झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून अनेकांना गळाला लावण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.