मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसल्याची चिन्हे आहेत अशा पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी बोलून दाखविली आहे. शिवसेना-भाजपा महायुतीने यंदाची विधानसभा निवडणुका एकत्र लढविल्या मात्र भाजपाच्या घटलेल्या जागा पाहून शिवसेनेने सत्तावाटपात ५०-५० फॉर्म्युल्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा सांगितल्याने सत्ता स्थापनेचं घोडं अडलं आहे.
भाजपाचे नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत रावल यांनी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, काही जागा थोड्या कमी फरकाने हरल्या आहेत. या सर्व जागा पुन्हा जिंकू असा निर्धार करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. शिवसेनेची ताठर भूमिका कायम राहिल्यास राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघ आहे. या पाचपैकी ४ जागांवर भाजपाने निवडणुका लढविल्या आहेत. यात धुळे ग्रामीण, साक्री येथील जागा भाजपा कमी फरकाने पराभूत झाली आहे. जिल्ह्यात पाचही जागा लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. निवडणुका पुन्हा झाल्यातर आमची लढण्याची तयारीही आहे असं जयकुमार रावल यांनी सांगितले. तसेच या निवडणुकीत मोठे यश मिळवून राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहोत असं बैठकीत सांगण्यात आलं.
सत्ता वाटपाचा पेच सुटत नसल्याने आज शिवसेनेचे नेते संजय राऊत शिष्टमंडळासह राज्यपालांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी संजय राऊत यांनी भाजपाची फक्त मुख्यमंत्रीपदावर चर्चा होईल असं सांगितले आहे. मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजपा तयार नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षात अद्यापही सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे निकाल लागून आठवडा झाला तरी राज्यात नवीन सरकार स्थापन झालं नाही.
तसेच राज्यात सात दिवसांत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं.
धमक्या, तपास यंत्रणांची जोरजबरदस्ती यांचा काही एक परिणाम न झाल्याने मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या धमकीचा पाद्रा पावटा सोडला आहे. '7 नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल. मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे ते या वक्तव्यावरून दिसते. कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास कमी पडला की हे व्हायचेच किंवा कायदा अथवा घटनेची गळचेपी करून हवे ते साध्य करायचे ही भूमिकासुद्धा त्यामागे असू शकते असा आरोप शिवसेनेने भाजपावर केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा यातील तिढा कधी सुटणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.