श्रीगोंदा/कर्जत (अहमदनगर) : कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नराधमांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपर्डीकरांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. कोपर्डी येथील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली नाही, अशी टीका झाली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी दुपारी अचानक भेट दिली. त्यांच्या दौऱ्याबाबत काहीही पूर्वकल्पना नव्हती. ते थेट पीडित कुटुंबीयांच्या घरी सांत्वनासाठी गेले. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व त्रास होत आहे, अशी तक्रार मुलीच्या एका नातेवाईकाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याबाबत विचार करू, असे ते म्हणाले.पीडित कुटुंबाच्या घराबाहेर जमलेल्या काही लोकांशीही त्यांनी संवाद साधला. मी पीडित कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून या दुर्दैवी घटनेची माहिती घेतली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. ही दुर्दैवी घटना समजल्यानंतर खूप वेदना झाल्या. सरकार म्हणून सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. कुटुंबाच्या मागे सरकार उभे आहे. न्यायालयीन प्रक्रियेची मी स्वत: दररोज माहिती घेणार आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते त्यांच्यासोबत होते. (प्रतिनिधी)गुप्तवार्ता शाखा, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कोपर्डीत होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पना नव्हती. कोणीतरी ‘व्हीव्हीआयपी’येऊ शकतात, एवढाच संदेश पोलिसांना देण्यात आला होता. त्यासाठी सकाळपासूनच बंदोबस्त वाढविला होता. मुख्यमंत्री दिल्लीहून विमानाने बारामतीत उतरले. तेथून वाहनाने ते साडेचार वाजता कोपर्डीत पोहोचले. वीस मिनिटे थांबून ते बारामतीकडे रवाना झाले. माध्यमिक शाळेची मागणी च्खा. छत्रपती संभाजीराजे यांनीही पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी आ. कपिल पाटील यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावात सातवीनंतर माध्यमिक शिक्षणाची सुविधा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणू, असे पाटील यांनी सांगितले.
फाशीपर्यंत पोहोचविणारच
By admin | Published: July 25, 2016 5:07 AM