मुंबई : मुंबईला महाप्रलयाच्या खाईत ढकलणारी मिठी नदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. विशेषत: मिठी नदीचा बराचसा भाग महापालिकेच्या ‘एल’ वॉर्डमधून वाहत असून, येथील प्रभाग क्रमांक १६२, १६६ आणि १६८ मधील राजकीय पक्षांचे उमेदवार या मुद्द्यांवरून एकमेकांवर कुरघोडी करू पाहणार आहेत. मिठीच्या मुद्द्याव्यतिरिक्त झोपड्यांचे पुनर्वसन आणि छोट्या रस्त्यांची कामे हे विषयही उमेदवारांपुढील आव्हान असून, या विषयांना राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवार कसे हाताळतात? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह मुंबई महापालिकेने यापूर्वी मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम केले आहे. मिठी खोल आणि रुंद झाली असली, तरी मिठीलगतच्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासन फारसे काही यशस्वी ठरलेले नाही. शिवाय मरोळ येथून सीएसटी-कलिना रोडपर्यंत वाहणाऱ्या मिठी नदीत लगतच्या कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. हे रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यासह लगतच्या भंगारविक्रेत्यांनी नदीच्या काठाला अक्षरश: डम्पिंग ग्राऊंड बनवले आहे. सीएसटी-कलिना रोड येथे हे चित्र प्रामुख्याने नजरेस येत असून, लाल बहादूर शास्त्री मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलात प्रवेश करताना लागणाऱ्या पुलालगतही हे चित्र प्रामुख्याने पाहण्यास मिळत आहे.विशेषत: सीएसटी-कलिना रोड आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील मिठीच्या नदीच्या प्रदूषणाबाबत मागील पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे अपेक्षित होते. मात्र, एखाद दुसरे आंदोलन वगळता लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे क्रांतिनगर, संदेशनगर, कलिना, सीएसटी येथे मिठीलगत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मिठी नदीच्या प्रदूषणाच्या दुर्गंधीचा अतोनात त्रास होत आहे. यावर महापालिकेने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. परिणामी, ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १६१, १६६ आणि १६८ मध्ये राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारांकडून उर्वरित मुद्द्यांसह मिठी नदीच्या मुद्द्यालाही हात घातला जाणार आहे. एकंदर ‘एल’ वॉर्डमधील विमानतळालगतच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, कुर्ला-अंधेरी रोडच्या रुंदीकरणाचा प्रश्न, नाल्यांच्या साफसफाईसह शौचालयाचा प्रश्न; अशा अनेक प्रश्नांसह मिठी नदीचा मुद्दाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कळीचा ठरणार असून, या सर्व पार्श्वभूमीवर मतदार आपले पारडे कोणाकडे झुकवतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)>कित्येक वर्षांपासूनअस्वच्छता कायम‘एल’ आणि ‘एच-ईस्ट’ या दोन्ही वॉर्डच्या सीमेवर मिठी नदी आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गासह सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून सांताक्रूझ पूर्वेला जाताना मिठीलगतच्या प्रदूषणाकडे सहज लक्ष वेधले जाते. नदीलगत भंगार साहित्य जमा झाले असून, येथील पाणी रसायनमिश्रित आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरातील अस्वच्छता अशीच आहे. परिणामी याचा लगतच्या रहिवाशांना त्रास होत असून, महापालिकेसह लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या साफसफाईची कामे महापालिका हाती घेते. मात्र पावसाळा संपला तरी ही कामे पुर्ण होत नाहीत. विशेषत: मिठी नदीतून काढण्यात आलेला गाळ कुठे टाकण्यात आला? अशा आशायाचे प्रश्न यापूर्वीच उपस्थित करण्यात आले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे स्थानिकांचे मत आहे.
प्रचारामध्ये ‘मिठी’ गाजणार
By admin | Published: January 19, 2017 3:12 AM