मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाने काँग्रेसला सावरकरविरोधी असल्याचं म्हटलं आहे तर काँग्रेस सावरकरविरोधी नव्हे तर त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधात होती असं म्हटलं आहे. अशातच सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापेक्षा धर्मनिरपेक्ष माणूस सापडणार नाही, इंदिरा गांधीही सावरकरांच्या अनुयायी होत्या असं विधान केलं आहे.
याबाबत बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचा सन्मान केला, मला ठामपणे वाटते की त्या सावरकरांच्या अनुयायी आहेत कारण त्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, सैन्य आणि परराष्ट्र संबंध इंदिरा गांधी यांनी मजबूत केले, त्यांनी अणुचाचणी देखील केली. हे सर्व नेहरू आणि गांधींच्या तत्वज्ञानाविरूद्ध होतं असंही त्यांनी सांगितले
तसेच असदुद्दीन औवेसी यांनी सावरकरांच्या विचाराचं पालन केले पाहिजे. तुम्ही हिंदू किंवा मुस्लीम नसून भारतीय आहात. संसदेत जात, धर्म, लिंग वगैरे वगळता सर्वांनी एकत्र यावं अशी सावरकरांची अपेक्षा केली. सावरकरांपेक्षा अधिक धर्मनिरपेक्ष माणूस सापडणार नाही असा टोला रणजीत सावरकरांनी औवेसी यांना लगावला आहे.
दरम्यान, इंग्रजांकडे माफी मागणाऱ्या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नये, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलेल्या संकल्पपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये राज्याची अस्मिता आणि अभिमानास्पद वारसा जोपसण्यासाठी भाजपाने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले होतं.