मुंबई - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र अजूनही भाजप-शिवसेना युतीतील जागावाटाप बाबतचा निर्णय होऊ शकला नाही. तर युती झाली तर नाराज असलेल्या इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. मात्र यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
विधानसभा निवडणुकीत युती होणार आहे. मात्र युतीनंतर बंडखोरीची शक्यता बिलकुल नाही. त्याचे कारण असे की, भाजप-शिवसेनेचं संघटन संपर्क मोठा असल्याने नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना समजवण्याची काही व्यवस्था असल्याचे पाटील म्हणाले. तर नाराज होणार हे नैसर्गिक आहे, मात्र ते त्यामुळे बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जातील याची शक्यता नसल्याचा दावा सुद्धा पाटील यांनी केला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल तिथे शिवसेना व जिथे सेनेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी भाजप आपली पूर्व तयारीची ताकद त्या उमेद्वारच्या पाठीमागे लावणार. तर भाजप-शिवसेना महायुतीचे विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा लक्ष असल्याचे पाटील म्हणाले.