ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या आड असलेल्या १४७ वृक्षांचे सर्वेक्षण करून योग्य त्या कारवाईसाठी यासंदर्भातील प्रस्ताव येत्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्याची हमी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली. मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या मार्गावर पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम प्रदीर्घ काळापासून रखडले आहे. कुर्ला ते ठाणे या टप्प्याचे काम पूर्ण झाले असले तरी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला या टप्प्यातील काम अद्याप सुरूच झालेले नाही. तर, ठाणे ते दिवा या टप्प्यातील कामापुढे झाडांचा अडथळा निर्माण झाला आहे. रेल्वेतील गर्दीमुळे या मार्गावर रेल्वेचे वारंवार अपघात होऊन प्रवाशांना जीव गमवावे लागत असल्याची गंभीर दखल घेऊन खासदार शिंदेंनी शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. दिव्याशी संबंधित अनेक समस्यांविषयीही या वेळी चर्चा झाली. रेल्वेकडून सर्व तयारी असून केवळ महापालिकेकडून झाडांबाबत परवानगी मिळत नसल्यामुळे काम रखडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यावर, आयुक्तांनी तत्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दिवा स्थानकानजीकचे रेल्वे फाटक बंद करण्यासाठी तेथे उड्डाणपूल उभा करण्याच्या कामातही ठाणे महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याची बाब त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणली. पूर्वेला हा आरओबी जिथे उतरणार आहे, त्या ठिकाणची काही बांधकामे हटवावी लागणार असून त्यांचे योग्य ते पुनर्वसन करून आवश्यक ती कारवाई ठाणे महापालिकेने त्वरित सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यालाही आयुक्तांनी मंजुरी दिली असून स्वत: या कामी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. महापौर संजय मोरे यांनीही रहिवाशांची भेट घेऊन या प्रश्नातून तोडगा काढण्याची ग्वाही दिली.दिवा-शीळ मार्गासाठी ३ कोटी मंजूरदिवा येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या दिवा-शीळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी बैठकीत चर्चा झाली असता या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी आयुक्तांनी ३ कोटी रु पये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
पाचव्या, सहाव्या रेल्वेमार्गातील वृक्षांचे अडथळे होणार दूर
By admin | Published: December 06, 2015 1:13 AM