राज्यभरात कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:19 PM2021-09-19T12:19:57+5:302021-09-19T12:20:39+5:30
कोरोनाने पती गमावलेल्या महाराष्ट्रातील एकल महिलांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेतली.
मुंबई : कोरोनामुळे ज्यांचे पती मृत्युमुखी पडले, अशा एकल महिला महाराष्ट्रात किती आहेत? त्यांचा सर्व्हे तातडीने करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला बालविकास विभागाच्या सचिवांना दिले. कोरोना सुरू झाल्यापासून ते ३० ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या कालावधीचा सर्व्हे करण्यात येणार आहे. यासाठीची मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी बैठकीत केली होती.
कोरोनाने पती गमावलेल्या महाराष्ट्रातील एकल महिलांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेतली. बैठकीला खा. सुप्रिया सुळे, संबंधित विभागांचे प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने जयाजी पाईकराव, हेरंब कुलकर्णी, प्रतिभा शिंदे, रेणुका कड व अल्लाउद्दीन शेख उपस्थित होते.कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलांना एकटे पडू देणार नाही व त्यांचे संसार सावरण्यासाठी या भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र शासन उभे राहील. त्यासाठी शासनाच्या सध्याच्या योजना, प्रस्तावित योजनांसह गरज पडल्यास नवीन नावीन्यपूर्ण योजना तयार करत त्यांचे सक्षमीकरण केले जाईल. गरज पडल्यास कॅबिनेटमध्ये नवीन प्रस्तावही आणला जाईल, असे पवार यावेळी म्हणाले.
खा. सुप्रिया सुळे यांनीही एकल महिलांचे मालमत्ताविषयक अधिकार शाबूत राखण्यासाठी विविध विभागांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावेत व प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.