मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून, सरकार चालविण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित केला जात आहे. तिन्ही पक्षांची ध्येयधोरणे, विचारसरणी बघता हा कार्यक्रम ठरविताना अडचणी येतील, असे दिसते. शिवसेनेची विचारसरणी हिंदुत्वाची आहे. मुस्लिमांच्या आरक्षणाचे या पक्षाने कधीही समर्थन केलेले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी या आरक्षणासाठी नेहमीच आग्रही राहिली आहे. आघाडी सरकारच्या काळात असे आरक्षण दिलेले होते, पण ते टिकले नव्हते. शिवसेनेने सातत्याने कडवट हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिमांवर टीका केली आहे.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांची भूमिका एकच असल्याचे दिसते. शिवसेनेच्या वचननाम्यात दहा रुपयांत सर्वसामान्यांना जेवणाची थाळी ही प्रमुख घोषणा होती. तथापि, लोकानुनयाच्या अशा घोषणांनी सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडतो, अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली, तर अडचण होऊ शकते.शिवसेनेने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. मात्र, काँग्रेसने अशी मागणी कधीही केलेली नव्हती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मुरड घालावी लागेल का, हा औत्सुक्याचा विषय आहे. शिवसेनेइतकीच कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. धर्मनिरपेक्ष काँग्रेसला हिंदुत्ववादी शिवसेनेशी जुळवून घेताना अनेक मुद्द्यांवर धोरणात्मक अडचणी येऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करताना आणि त्यासाठीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करताना या व्होट बँकेवर आच येणार नाही, याची काळजी काँग्रेस-राष्ट्रवादीला घ्यावी लागणार आहे.
सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरविताना तिन्ही पक्षांची होणार कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 4:34 AM