बेळगाव - बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडाला आहे. (Belgaum Municipal Corporation Election Results) अनेक वर्षे बेळगाव महानगरपालिका ताब्यात ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला यावेळी केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. (maharashtra ekikaran samitee) दरम्यान, एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपाच्या लाटेमध्ये एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवत बेळगाव महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि मराठी भाषिकांचा भगवा फडकवत ठेवला आहे. (These are the four Candidate of the Maharashtra Unification Committee, who kept the saffron of Marathi speakers in Belgaum)
आज लागलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निकालामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवला. वैशाली भातकांडे, शिवाजी मांडोळकर, रवी साळुंके आणि बसवराज मोदगेकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झाले. वैशाली भातकांडे यांनी प्रभाग क्रमांक १० मधून विजय मिळवला. तर शिवाजी मांडोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून वियज मिळवला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रवी साळुंके यांनी प्रभाग क्रमांक २७ मधून विजय मिळवला. तर बसवराज मोदगेकर यांनी प्रभाग क्रमांक ४८ मधून विजय मिळवला.
बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर लढवल्या गेलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर गेली अनेक वर्षे बेळगावातील मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून, एकीकरण समितीच्या पदरात केवळ चार जागा पडल्या आहेत.
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच पक्षीय पद्धतीने लढवली गेल्याने या निवडणुकीच्या निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने बेळगाव महानगरपालिकेच्या निकालांमध्ये वर्चस्व दिसून आले. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली. अखेर भाजपाने ३६ जागांवर बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसच्या खात्यात १० जागा गेल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीला ४ जागा मिळाल्या. उर्वरित १० जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.