नारायण बडगुजर पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बिबट्या निदर्शनास आल्याची चर्चा आठवड्याच्या सुरुवातीस झाली. मात्र ते रानमांजर असल्याचा निष्कर्ष वन विभगाच्या अधिकाऱ्यांनी काढला. बिबट्याच्या चर्चेने शहरवासीयांमध्ये घबराट होती. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षाचा हा परिणाम. त्याबाबत वन विभागाचे पुणे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांच्याशी साधलेला संवाद.वन्यप्राणी जसे की, बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याचे कारण काय? पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर जास्त दिसून येतो. मात्र दिवसेंदिवस शहरीकरण होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते शेतातील दाट पिकांमध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी शेती मानवी वस्तीलगतही असते. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागासह शहरातील दाट वस्तीतही बिबटे निदर्शनास का येतात? बिबटे दाट झाडी किंवा पिकांमध्ये वास्तव्य करतात. जुन्नर आदी भागाप्रमाणे आता पिंपरी-चिंंचवड शहर किंवा पुणे जिल्ह्याच्या इतर भागात अशा पद्धतीचे पिके घेण्याकडे कल वाढत आहे. यात उसाचा समावेश होतो. उसात दडून राहणे बिबट्याला सोयीचे असते. त्यामुळे उसाची शेती ज्या भागात आहे तेथे बिबट्याचे वास्तव्य दिसून येते. आपल्या भागात अशी ऊस शेती वाढत आहे. वन्यप्राणी व मानवातील संघर्ष कसा टाळता येईल?जंगले तसेच पाण्यांचे स्त्रोतही कमी होत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. अशावेळी त्यांना त्रास न देता त्यांना अन्न आणि पाणी उपलब्ध करून द्यावे. विकासाचा अतिरेक थांबविला पाहिजे.प्राण्यांपासून बचाव कसा करावा?शहरात बिबट्या दिसल्यास गोंगाट किंवा गर्दी न करता त्याला निघून जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. त्रास न दिल्यास तो हल्ला करीत नाही.वन्यप्राण्यांना जेरबंद करण्याची यंत्रणा आहे का? पुणे येथे रेस्क्यू पथक आहे. त्याच्या चार तुकड्या आहेत. त्यात ३८ कुशल व प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. वन्यप्राण्याला जेरबंद करणे किंवा तो कोठे अडकला असल्यास त्याची सुटका करणे आदी कामे या पथकाकडून केली जातात. त्यासाठी जाळी, रेस्क्यू व्हॅन यासह प्राथमिक उपचाराची पेटी या पथकाकडे असते. त्यामुळे वन्यप्राणी जखमी असल्यास तत्काळ उपचार करता येतात. या पथकास स्थानिक कर्मचारीही मदत करतात. संबंधितांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित पथक मदत कार्य करते.आपल्या जिवास धोका असल्याचे जाणवल्यावर वन्यप्राणी हल्ला करतात. बिबट्या आपल्यापेक्षा जास्त उंचीच्या प्राण्यांवर हल्ला करीत नाही. मात्र गर्दी आणि गोंगाटामुळे तो बिथरतो. भीतीमुळे त्याच्याकडून हल्ला केला जातो. त्यामुळे त्याला त्रास देऊ नये.वन्यप्राण्यांना त्यांच्या मूळ अधिवासात राहू देणे आवश्यक आहे. त्यांना त्रास न देणे हेच त्यांच्या आणि मानवाच्याही हिताचे आहे.
...म्हणून मानवी वस्तीत आला बिबट्या, जाणून कारणे आणि परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 8:49 AM