'ही' आहेत अब्दुल सत्तारांच्या नाराजीचे कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 12:16 PM2020-01-04T12:16:04+5:302020-01-04T12:20:20+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तार यांना आपल्या मर्जीचा अध्यक्षपद बसवावा अशी इच्छा होती.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. मात्र सत्तार यांच्या राजीनाम्यामागे तीन महत्वाचे कारणे असून त्यामुळे सत्तार यांनी राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचा अध्यक्ष नको
मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळू नयेत म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांकडून हालचाली करण्यात आल्याचे बोलले जात होते. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषेदेत काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नयेत म्हणून सत्तार यांचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच शुक्रवारी सत्तार यांचे समर्थक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं. तर सत्तार यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे अध्यक्षपद जाते की काय, असा दबाव काँग्रेसवर तयार करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असल्याचे पहिले कारण असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेत स्थानिक राजकरणात निर्णय घेण्याचे अधिकार
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तार यांना आपल्या मर्जीचा अध्यक्षपद बसवावा अशी इच्छा होती. मात्र त्यांना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी काही जुमानले नाही. त्यामुळे शिवसेनेत स्थानिक राजकरणात सत्तार यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याची नवी खेळी करून दाखवली असल्याची चर्चा सुरू आहे.
कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही
ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरवातीपासूनच होती. तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात होते. तर सत्तार यांना सुद्धा हिच अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सत्तार यांना राज्यमंत्रीपद दिले. त्यामुळे सुद्धा सत्तार नाराज होते.