अनिल भापकर
मुंबई, दि. १६ - मोठा गाजा वाजा करत मंगळवारी अखेर व्हॉट्सअॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग जगभर सर्वांसाठी सुरु झाले . येणार येणार म्हणून अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली. व्हॉट्सअॅपने बिटा व्हर्जन साठी व्हिडीओ कॉलिंग ची सुविधा चालू केली. मात्र व्हिडीओ कॉलिंगचा वापर करण्यासाठी एकच अट सध्या आहे ती म्हणजे तुम्ही ज्या व्हॉट्सअॅप युझर्सला व्हिडीओ कॉल करत आहेत त्याने सुद्धा व्हॉट्सअॅप अपडेट केले असले पाहिजे तरच तुम्ही व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता .मात्र व्हॉट्सअॅप हे काही व्हिडीओ कॉलिंगची सेवा देणारे एकमेव अॅप नाही .
कारण या अगोदर स्नॅपचॅट ,फेसबुक मेसेंजर ,व्हायबर ,हँगआउट,ड्युओ ,फेसटाईम तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे स्काईप आदी मेसेंजिंग अॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहे. मात्र टेक्नोसॅव्ही जगतात उत्सुकता होती ती म्हणजे व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंग फीचर कधीपासून सुरु करतो .यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. अखेर तो दिवस उजाडला आणि मंगळवारी ही सेवा सुरु झाली .सध्या अनेक व्हिडीओ कॉलिंग अॅप उपलब्ध यापैकी काही महत्वाचे व्हिडीओ कॉलिंग अॅप विषयी आपण जाणून घेऊ.
ड्युओ :यावर्षी मे महिन्यात गुगलने अॅलो आणि ड्युओ अशा दोन अॅप स्मार्टफोन युझर्स साठी उपलब्ध करून दिल्या . यापैकी अॅलो हे मेसेंजर अॅप आहे तर ड्युओ हे खास व्हिडिओ कॉलिंग साठीचे अॅप आहे. ड्युओ वापरायला अत्यंत सोपे आहे . यामध्ये लिमिट मोबाइल डेटा हे ऑप्शन आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता . म्हणजे तुमचा मोबाइल डेटा एका लिमिट पर्यंतच खर्च करायचा हे तुम्ही ठरवू शकता . शिवाय नॉक नॉक हे फिचर सुद्धा यामध्ये आहे. तसेच नको असलेल्या लोकांना ब्लॉक करण्याची सुविधा सुद्धा ड्युओ मध्ये आहे. ड्युओ चे अजून एक महत्वाचे फिचर म्हणजे कॉल चालू असताना तुम्ही वाय-फाय किंवा मोबाईल डेटा यामध्ये स्विच करू शकता ते सुद्धा कॉल ड्रॉप न होता . एकूणच काय तर वापरायला सोपे आणि हवे तेवढेच फिचर घेऊन ड्युओ सेवा देत आहे.
फेसटाईम :फेसटाईम हे सुद्धा व्हिडिओ कॉलिंग सेवा देणारे अजून एक चांगले अॅप आहे. यामध्ये सर्वात चांगले फिचर म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉल करता तेव्हा समोरच्या कडे फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन नसला तरी चालतो तुम्ही त्या सोबत फक्त ऑडिओ कॉल करू शकता . फेसटाईम ची ऑडिओ कॉलिटी फार चांगली आहे. फेसटाईम चे लिमिटेशन म्हणजे हे फक्त अँपल युझर्स साठीच उपलब्ध आहे.
स्काईप :व्हिडिओ कॉलिंग मध्ये सर्वात मोठा प्लेअर म्हणजे स्काईप एवढी मोठी ओळख स्काईपची आहे. स्काईप हे सगळ्या प्लॅटफॉर्म वर काम करते जसे कि विंडोज ,अँड्रॉइड ,आयओएस ,पीसी आदी. स्काईपमध्ये अनेक फिचर आहेत जसे कि ग्रुप व्हिडिओ कॉल्स ,फ्री व्हॉइस कॉल्स ,ग्रुप चॅट ,शेअर फोटो,व्हिडिओ ,इमोजी आदी अनेक फिचर यात आहे.
हँगआउट :व्हिडिओ कॉलिंग मधील अजून एक मोठे नाव म्हणजे गुगलचे हँगआउट. यामध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग सोबतच अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. जसे कि ग्रुप चॅट , ग्रुप व्हिडिओ कॉलिंग ,फोटो ,व्हिडिओ ,स्टिकर ,ईमोजी आदी पाठविणे आदी सुविधा यामध्ये आहेत.
जस्टॉक :-जस्टॉक हे एक अजून फक्त व्हिडिओ कॉलिंग साठी असलेले अॅप आहे. यामध्ये वन टू वन व्हिडिओ कॉलिंग सोबतच ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये व्हिडिओ कॉलिंग चालू असताना फोटो शेअर करता येतात तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा सुद्धा यामध्ये आहे. जस्टॉक हे अँड्रॉइड आणि आयफोन दोघांना सुद्धा सपोर्ट करते. याशिवाय अजूनही अनेक फीचर्स यामध्ये उपलब्ध आहे