नाशिक : माणसं प्रवासाला का निघतात? - काही कारणाने खुणावणाऱ्या मुक्कामाला पोचावं म्हणून!- पण मुक्कामाचंं ठिकाण मुद्दाम सोडून जगाच्या नकाशावरल्या त्रास देणाऱ्या रेघा निदान आपल्यापुरत्या तरी पुसता येतात का ते पाहावं, म्हणून तब्बल सतरा हजार किलोमीटर्सचा रस्ता पायाखाली घालायला निघालेल्या त्रिकुटाला तुम्ही काय म्हणाल?हे आहेत नाशिकचे ‘ग्लोब व्हिलर्स’. वेगाने वाढणाऱ्या नाशिकच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या तीन प्रमुख उद्योगांचे तिघे तरुण शिलेदार : ‘सेवा आॅटोमोटिव्ह’चे संचालक संजीव बाफना, गजरा उद्योगाचे संचालक राजेंद्र पारख व अशोका बिल्डकॉनचे संचालक आशिष कटारिया! हे तिघेही सध्या एका रोमांचक ‘रोडट्रीप’च्या नियोजनात गुंतले आहेत. येत्या शुक्रवारी सकाळी लंडनच्या प्रसिद्ध ट्रफ्ल्गार स्क्वेअरमधून त्यांची टोयोटा फॉर्चुनर निघेल आणि तब्बल ४५ दिवसांनी मजल दरमजल करत ते नाशिक मुक्कामी पोचतील, तेव्हा तब्बल बारा देशांच्या सीमा त्यांनी ओलांडलेल्या असतील. रिगा हे ‘झिरो अल्टीट्यूड’चे ठिकाण ओलांडून जाणारा हा प्रवास एका टप्प्यावर हिमालयाचे कडे चढून तब्बल १८,००० फुटांच्या उंचीवर पोचेल... आणि अटलांटिक महासागराच्या पाण्याने भिजलेली या त्रिकुटाच्या गाडीची चाकं पुढे एव्हरेस्टच्या तळाला स्पर्श करून पुढे सरकतील.ही झाली भौगोलिक आव्हानं. शिवाय वाटेवर भेटणारं टोकाच्या फरकाचं हवामान त्यांची परीक्षा पाहील. वेगवेगळ्या देशांतून धावणारे रस्ते परस्परांहून वेगळे असतील. देश बदलतील, सीमा ओलांडतानाचे निकष बदलतील तसे ड्रायव्हिंगचे नियमही बदलतील आणि बदलत्या भूगोलाबरोबर बदलणारं धगधगतं राजकीय वास्तवही त्यांच्या सोबतीने फिरत राहील.
मंझील से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते!
By admin | Published: May 03, 2015 5:13 AM