राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापासून, त्यांच्याच (Eknath Shinde) गटातील आमदारांचे सुरू असलेले नाराजी नाट्य अद्यापही संपलेले दिसत नाही. यातच, चर्चा असूनही या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काल रात्री एक ट्वीट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, असा उल्लेख केला होता. मात्र, या ट्विटची चर्चा सुरु होताच शिरसाटांनी ते डिलीटही केले. यानंतर मात्र, आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ही ब्लॅक्मेलिंग आहे..., हे सगळे ब्लॅकमेलरच आहेत, हे बाजारबुणगे आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे. ते लोकमतशी बोलत होते. संजय शिरसाट यांनी एक ट्विट केले होते, यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले, यासंदर्भात विचारले असता, सावंत म्हणाले, "ब्लॅक्मेलिंग आहे हो ही, हे सगळे ब्लॅकमेलरच आहेत. मुळात, ते तेथे गेले आणि त्यांना मंत्री केले नाही. म्हणजे, आता जनतेच्या लक्षात यायला हवे, ही माणसं तेथे कशासाठी गेली होती? कुठले हिंदूत्व आहे? कुठला अन्याय त्यांच्यावर झाला. काही नाही. आता मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून ते (संजय शिरसाट) आणि गोगावले नाराज आहेत. ते ट्विट करून त्यांनी दाखवून दिले, की आता चाललो माघारी."
"ते (संजय शिरसाट) माघारी चाललो म्हटल्यावर, त्यांचे बडबोले प्रवक्ते धावत आले आणि त्यांनी सांगितले, की त्या दोघांनाही पुढच्या होणाऱ्या विस्तारात मंत्री पद देण्यात येणार आहे. पण त्यांना कुणी अधिकार दिला? मला माहीत नाही. याचाच अर्थ काय? की तुमची निष्ठा कशाशीही नाही. ना हिंदुत्वाशी, ना विचारांशी, ना शिवसेनेशी. ना फुटीरवादी गटाशी आहे. तुमची निष्ठा केवळ खुर्चीसोबत आहे. हे बाजारबुणगे लोक आहेत, हे आता जनतेला कळेल. हे लोक जनतेशीही कशी फसवणूक करतात. हे आता आपल्यला दिसत आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
'त्या' ट्विटसंदर्भात काय म्हणाले संजय शिरसाट? - शिरसाट यांनी टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील जोडलं होतं. पण, काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. तसेच, आपण नाराज नसून शिंदे गटात आम्ही सर्वजण खूप खुश आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मी जे ट्विट केलं होतं, ते उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं होतं. ते व्यक्त करताना कुटुंब प्रमुखाची भूमिका ते बजावत होते. त्यामुळे, आजही माझं मत आहे की, तुम्ही कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावत असाल तर कुठेतरी कुटुंबातील व्यक्तींच मत लक्षात घ्यायला हवं. तुमचं मत काय आहे, यापेक्षा तुमच्या कुटुंबाचं मत काय आहे याला मान दिला पाहिजे, हा त्या मागचा अर्थ होता, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. तसेच, आपण एकनाथ शिंदेंसोबतच असून कुठलीही नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.