ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १० - कोट्यवधींचे बक्षीस लागले म्हणून गोमंतकीय महिलेला लाखोंचा गंडा घालणा-या दोघा नायजेरीयन नागरिकांना गोवा पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. ते दोघेही तशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी १० राज्यातील पोलिसांना हवे असल्याचे चौकशी दरम्यान समजले.
संशयित ओबिना लोकोडेमस आणि नाजिफोर कोलिन्स यांनी कोट्यवधीची बक्षिसे लागल्याचे सांगून आणि कोट्यवधी पैसे पाठवित असल्याच्या सुरस कथा रचून गोव्याबाहेरही अनेक जणांना फसविले होते. एकूण इतर १० राज्यातील लोकांना त्यांनी फसविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यापैकी काही राज्यांतील पोलीसांकडून संशयितांच्या कोठडीची मागण करण्यात आली असल्याची माहिती सायबर गुन्हा विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. गोव्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांची इतर राज्यांच्या पोलीसांकडे सोपविण्याची शक्यता आहे.
गोव्यातील एका महिलेला दीड कोटी रुपये भेट पाठविण्यात आली असल्याचा मेसेज पाठवून नंतर ते पैसे स्वीकारण्यासाठी अबकारी शुल्क आणि इतर खर्च मिळून ८ लाख रुपये भरण्याची सूचना या संशयितांनी केली होती. त्यांच्यावर विश्वास टाकून ती रक्कम या महिलेने त्यांनी दिलेल्या खात्यात जमा केली होती. नंतर आपल्याला फसविले गेले हे समजल्यावर महिलेने सायबर विभागात तक्रार नोंदविली होती.
सायबर तज्ज्ञ असलेले पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी या प्रकरणात विशेष लक्ष्य घेतले होते. संशयितांचे लॉकेशन मिळाल्यावर दिल्ली पोलीसांशी स्वत: ते बोलले होते. नंतर दिल्ली पोलिसांच्या मदतीने तिथे गेलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने कारवाई करून दोन्ही संशयितांना अटक केली होती. गोवा पोलीसांच्या इतहासात पहिल्यांदाच अशा प्रकरणात संशयितांना झालेली ही अटक आहे.
हे भामटे महिलांनाच लक्ष्य करीत होते. इतर राज्यात फसविले गेलेल्यात बहुतेक सर्व महिलाच आहेत. त्यानांही फसविण्यासाठी अशाच कहाण्या त्यांनी रचल्या होत्या. आपल्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यु झाला आहे. आपल्या मागे कुणीही नाही. तू मला बहिणीसारखी आहे आणि त्यामुळे तुला काही तरी भेट पाठवावी असे आपल्याला वाटते अशा कहाण्या सांगून नंतर अबकारी कर आणि इतर करांच्या नावाने पैसे मागितले गेले.
संशयितांकडे सापडलेल्या मोबाईल फोनच्या कॉल रेकॉर्डवरून त्यांनी कुणा कुणाला फोन केले होते त्याची माहितीही पोलीसांनी मिळविली आहे. त्या लोकांना गोवा सायबर विभागाकडून बोलावण्यात येणार असल्याची माहितीही या विभागाकडून देण्यात आली. या मुले ही केस आणि मजबूत होणार असल्याचा सायबर विभागाचा दावा आहे.