अवघ्या महाराष्ट्राच्या राजाकडे किती संपत्ती असेल, विचारायची असते का? यंदा लोकसभा निवडणुकीत छत्रपती घराण्यांकडून दोन उमेदवार वेगवेगळ्या पक्षांकडून उभे आहेत. एक कोल्हापूरला दुसरे साताऱ्यात. पैकी कोल्हापुरच्या शाहु महाराजांनी आपली संपत्ती घोषित केली आहे. राहिली होती ती उदयनराजेंची. आज उदयनाराजेंनीही आपली संपत्ती घोषित करून टाकली आहे.
उदयनराजे साताऱ्यातून महायुतीकडून लोकसभा लढवत आहेत. आज त्यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी यामध्ये संपत्ती घोषित केली आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी २९६ कोटी रुपये संपत्ती जाहीर केली होती. उदयनराजेंनीही तेवढीच संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. उदयनराजे आणि भोसले कुटुंबीयांची एकूण संपत्ती ही 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे.
उदयनराजेंकडे ३० हजार ८३६ किलोंचे (2 कोटी 60 लाख 74 हजार) सोने चांदी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ४.७५ किलो सोन्याचे दागिने आहेत. उदयनराजेंच्या कुटुंबीयांकडे 628 ग्रॅम सोने आहे.
उदयनराजेंकडे दोन मर्सिडीज, ऑडी, फॉर्चुनर, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, एस क्रॉस आणि जिप्सी अशा कार आहेत. या गाड्यांची किंमत १ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये होते.
रोख रक्कम किती...उदयनराजेंनी त्यांचे उत्पन्न १६ कोटी ८५ लाख रुपये एवढे दाखविले आहे. परंतु सध्या त्यांच्याकडे रोख 5,85,715 रुपये आहेत. पत्नीकडे 1,35,980 रुपये कुटुंबीयांकडे 3,68,900 रुपये आणि मुलाकडे 22,400 रुपये आहेत.
जमिन किती...उदयन राजेंकडे १२७ कोटी, ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीची जमिन आहे. कुटुंबाच्या नावावर ५५ लाख रुपयांची जमिन आहे. तर बिगरशेती २० कोटी १४ लाख रुपयांची जमिन उदयनराजेंच्या नावावर आहे.
कर्ज किती...उदयन राजे जरी राजे असले तरी त्यांच्या डोक्यावर कर्जही आहे. उदयनराजेंवर २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२ रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे जंगम मालमत्ता १६ कोटी ८५ लाख रुपये एवढी आहे.