ठाणे : ठाण्यातील मराठ्यांच्या मूक मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून ज्याप्रमाणे नागरिक सामील झाले, तसेच परदेशांतूनही काही लोक मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते. या मोर्चात सामील होता यावे, या एकमेव हेतूने अमेरिकन महिलेने अमेरिकेला जाणे रद्द केले. ज्योती घाग असे त्यांचे नाव असून ‘मी जन्माने आणि कर्माने मराठा आहे’, असे सांगत वॉशिंग्टनच्या घागही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्या २६ सप्टेंबरला अमेरिकेला रवाना होणार होत्या. परंतु, ठाण्यात १६ आॅक्टोबरला मराठा समाजाच्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी अमेरिकेला जाणे रद्द केले आणि त्या रविवारी सकाळी या मराठा मूक मोर्चात सामील झाल्या. मोर्चाबद्दल भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, भारतात काही लोकांना धाक राहिलेलाच नाही. महिलांवरील अत्याचारांत सातत्याने वाढ होत आहे. कोपर्डीसारख्या घटनांमध्ये महिलांवर अमानुष अत्याचार होतात. त्यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मराठा समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो आहे, तो का उतरतो आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आम्ही जे रस्त्यावर उतरलो आहोत, ते केवळ आमचा हक्क मिळवण्यासाठीच. आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यांत कुठेही असलो तरी जन्माने आणि कर्माने मराठा आहोत, याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. मूळच्या ठाण्यातील सावरकरनगर येथे राहणाऱ्या ज्योती घाग यांचा वॉशिंग्टन येथे बांधकाम व्यवसाय आहे. तसेच शक्ती फॉर शाहिद नावाची सामाजिक संस्थाही त्या तिथे चालवतात. (प्रतिनिधी)
त्यांनी अमेरिकेला जाणे टाळले
By admin | Published: October 17, 2016 4:16 AM